विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : शहरातील गांधी चौक परिसरात चोरट्यांनी हातचलाखी करत दिवसाढवळ्या दुचाकीला लटकविलेली तब्बल ५० हजार रुपयांची थैली लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २६ मे) सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लालगुडा येथील शंकर धोटे यांनी वणी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून ५० हजार रुपयांची रक्कम काढली होती. पैसे असलेली थैली त्यांनी दुचाकीला लटकवली होती. त्यानंतर ते काही साहित्य खरेदीसाठी गांधी चौक परिसरात आले.
याचवेळी चोरट्यांनी पूर्वनियोजित पद्धतीने त्यांच्या अंगावर घाण टाकल्याचे सांगितले जात आहे. अंगावरील घाण साफ करण्यासाठी शंकर धोटे हे देवडे यांच्या दुकानाजवळ थांबले. त्यांचे लक्ष विचलित झाल्याचा फायदा घेत मागावर असलेल्या चोरट्यांनी दुचाकीवरील पैशांची थैली अलगद लंपास करून घटनास्थळावरून पलायन केले.
संपूर्ण घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून वणी पोलिसांनी फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.


