विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : विवेकानंद विद्यालय, वणी येथील सन २००५-२००६ च्या इयत्ता १० वी (अ) बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल २० वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेला “स्नेह मिलन सोहळा २०२६” अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी आणि भावनिक वातावरणात पार पडला. जुन्या मित्र-मैत्रिणी, गुरुजन आणि शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाल्याने उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी बालपणीच्या आठवणी ताज्या करत जुन्या काळातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. बोरकुटच्या लोळ्या, आलू नरडे, लिमलेट गोळ्या, बोर, आइस गोळा, चकली आणि चॉकलेटचा आस्वाद घेत सर्वांनी शालेय दिवस पुन्हा अनुभवले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय दिलीप आस्कर सर उपस्थित होते. तसेच सौ. चुमळे मॅडम, उपमुख्याध्यापक सुनील बेसकर सर, खोंडे सर, बेलेकर सर, गेडाम सर, राठोड सर, मेश्राम सर आणि पिटलावार सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षकांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी वर्ग शिक्षक स्व. मानकर सर आणि स्व. काकडे सर यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन सुप्रिया केदार यांनी केले, तर प्रस्तावना स्वप्नील अत्राम यांनी मांडली. आभार प्रदर्शन आशिष डंभारे यांनी केले.
रोहित वनकर यांनी आपल्या बासरीच्या मधुर सुरांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून देत शालेय आठवणींना उजाळा दिला. सुप्रिया केदार यांनी सादर केलेल्या सुरेल गीतामुळे कार्यक्रम अधिक भावनिक आणि संस्मरणीय ठरला. विविध मनोरंजनात्मक खेळांनी कार्यक्रमात आनंदाची भर घातली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंकज कासावार, अमरीश मिळमिले, महेश वराटे, मिथुन विधाते, सुजाता पेटकर, स्नेहल इनामे, गणेश अभंग, शिशिर हेपट, अभि पद्लमवार, शरद हेपट आणि सलीम हुसेन यांनी विशेष परिश्रम घेतले.
या स्नेह मिलन सोहळ्यामुळे गुरु-शिष्य नाते, मैत्री आणि जुन्या आठवणी पुन्हा नव्याने फुलल्या असून उपस्थितांनी हा क्षण आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याची भावना व्यक्त केली




