विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वणी शहरातील दिनानाथ नगर, लालगुडा परिसरात शुक्रवारी (दि. २२ मे २०२६) सकाळी सुमारे १२ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली. प्रिती बोंगिरवार यांच्या घरात किरायाने राहणारे ओम निमस्टकर यांच्या घराला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घरातून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडत असल्याचे पाहून परिसरातील नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले.
या प्रसंगी विनोद पचकटे, संजय खाडे, ओम निमस्टकर, दिपक कुंचलावे, राधा बंडे, संगीता पावडे, विद्या पचकटे, दुर्गा खंडाळकर, समीक्षा सोनवने आणि प्रणाली सोनवने यांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या धाडसी प्रयत्नांमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आले आणि मोठी जीवितहानी टळली.
या आगीत घरातील साहित्य, फर्निचर व इतर वस्तू जळून अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याने परिसरात त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
"नागरिकांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला", अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.





