ठळक बातम्या

    वणीत शेतशिवारात ट्रॅक्टर चालकाचा मृतदेह आढळला; उष्माघाताची शक्यता, वाढत्या तापमानाबाबत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     वणी : वणी शहरालगत मंदर व वागदरा (जुना) दरम्यान असलेल्या शेतशिवारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना बुधवार (२७ मे) रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. शंकर शंडकू आत्राम (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते शहरातील खडबडा मोहल्ला परिसरातील गॅस गोडाऊनजवळ वास्तव्यास होते.

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शंकर आत्राम हे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होते. ट्रॅक्टरच्या सहाय्याने लाकूड वाहतुकीचे काम ते करीत होते. मंगळवार (२६ मे) रोजी ते शेतशिवार परिसरात लाकूड गोळा करण्यासाठी गेले होते. दिवसभर प्रचंड उष्णता व उन्हाचा तडाखा असल्याने त्यांना त्रास जाणवू लागला असावा. त्यानंतर ते एका झाडाखाली विसावल्याचे सांगण्यात येत आहे.

    दरम्यान, वाढत्या तापमानामुळे त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतकाच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे उष्णतेचा गंभीर परिणाम झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

    शेतशिवाराकडे जाणाऱ्या नागरिकांना सदर व्यक्ती मृतावस्थेत दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


    वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी घ्यावी काळजी :

    सध्या तापमानात मोठी वाढ होत असून नागरिकांनी दुपारच्या तीव्र उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरणे तसेच शेतात किंवा मोकळ्या जागेत काम करणाऱ्यांनी वेळोवेळी सावलीत विश्रांती घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.




    Photo