ठळक बातम्या

    घुग्घुसमध्ये वेकोलि ओबीसी कर्मचाऱ्यांचे वार्षिक अधिवेशन; पदोन्नतीतील आरक्षणासाठी लढा सुरूच

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    घुग्घुस, चंद्रपूर : येथील प्रयास सभागृहात मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी 5 वाजता बॅकवर्ड क्लास कोल एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन (वेकोलि नागपूर) चे पहिले वार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले.

    कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन, दीपप्रज्वलन तसेच राष्ट्रगीताने करण्यात आली.

    मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष गुलाब सिंह, महासचिव जयबहादूर यादव, सुदामा यादव, राकेश कडू, दीपक टिकले तसेच दीपक चटप उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

    यावेळी वक्त्यांनी सांगितले की, बॅकवर्ड क्लास कोल एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनची स्थापना ओबीसी समाजाच्या हक्क व न्यायासाठी लढा देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून ओबीसी समाजाला नोकरीमध्ये 27 टक्के आरक्षण दिले जाते, मात्र पदोन्नतीमध्ये ही सुविधा मिळत नाही. याच मागणीसाठी संघटना सातत्याने संघर्ष करत असून आता या आंदोलनाने वेग घेतला आहे. ओबीसी समाजाला त्यांचा न्याय्य हक्क मिळवून दिल्याशिवाय संघटना शांत बसणार नाही, असा निर्धार वक्त्यांनी व्यक्त केला.

    कार्यक्रमाचे संचालन अजय पाटील यांनी केले.

    यावेळी वणी क्षेत्र ओबीसी असोसिएशनचे अध्यक्ष संकेत खोखले, महामंत्री श्रीकांत सावे, घुग्घुस अध्यक्ष घनश्याम कुटेमाटे, सचिव तुलसीदास ढवस, मुंगोली अध्यक्ष सुधाकर आसुटकर, सचिव सुधीर पिंपळकर, नायगाव अध्यक्ष अक्षय धोबे, सचिव श्रीराम रोडे, निलजई अध्यक्ष अक्षय कौरासे, सचिव राजू कुचनकर, पैनगंगा अध्यक्ष राम यादव, दीपक काळे, सावन ठाकरे, संतोष धोबे, संजय ताजने यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीकांत सावे यांनी केले.




    Photo