तरुणाई धोक्यात! वणीत वाढते ड्रग्सचे सावट, पोलिस कारवाईनंतर चिंता व्यक्त
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : शहरातील बी.एस.एन.एल. टॉवरच्या पाठीमागील परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणाऱ्या एका तरुणाला वणी पोलिसांनी रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. या कारवाईमुळे शहरात वाढत चाललेल्या नशेच्या प्रवृत्तीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
युवराज विजय उपरे (वय २१, रा. जुना कॉटन मार्केट, आशीर्वाद हॉटेल मागे, वणी) असे आरोपी तरुणाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ मे रोजी सायंकाळी ६:२५ वाजताच्या सुमारास वणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शुभम महानवर हे आपल्या पथकासह नियमित गस्तीवर होते. दरम्यान बी.एस.एन.एल. टॉवरच्या पाठीमागील परिसरात एक तरुण संशयास्पद अवस्थेत गांजा ओढत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ धाव घेत कारवाई केली.
पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्याजवळ गांजा भरलेली सिगारेट, माचिस तसेच गांजा भरण्यासाठी वापरण्यात येणारा ‘Tree Paper’ लिहिलेला कागद आढळून आला. सदर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपीविरुद्ध कलम ८ (क), २७ गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शुभम महानवर यांच्या लेखी तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक गजानन सावसाकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, वणी शहरात युवकांमध्ये वाढत चाललेली नशेची प्रवृत्ती ही अत्यंत चिंताजनक बाब बनत आहे. पोलिसांकडून वेळोवेळी ड्रग्स तस्करांवर कारवाया होत असल्या तरी युवकांच्या हाती अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने पालक, सामाजिक संघटना आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. जर वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर येणाऱ्या काळात अनेक तरुण नशेच्या गर्तेत अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाने केवळ कारवाई न करता ड्रग्स पुरवठा करणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर कठोर मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे.
युवा पिढीसाठी संदेश
“क्षणिक नशा आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते.”
आजची युवा पिढी ही देशाची खरी ताकद आहे. पण सोशल मीडिया, चुकीची संगत आणि दिखाव्याच्या नादात अनेक तरुण नशेच्या आहारी जात आहेत. सुरुवात मजा म्हणून होते, पण शेवट आयुष्य उद्ध्वस्त करणारा असतो.
गांजा, ड्रग्स आणि इतर अंमली पदार्थ हे शरीर, मेंदू आणि कुटुंब तिन्ही नष्ट करतात. नशेमुळे शिक्षण, करिअर, आरोग्य आणि समाजातील सन्मान धोक्यात येतो. त्यामुळे प्रत्येक युवकाने स्वतःला अशा व्यसनांपासून दूर ठेवणे ही काळाची गरज आहे.
“खेळाकडे वळा, स्वप्नांसाठी झुंजा… नशेपासून दूर रहा!”
