विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : तालुक्यातील मौजा वडगाव (धं) येथे प्लॉट विक्रीच्या नावाखाली महसूल विभागातील धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आला असून, बनावट फेरफार, खोटे सातबारा आणि बनावट व्यवहाराच्या आधारे नागरिकांची लाखोंची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तलाठी, मंडळ अधिकारी, दलाल आणि कथित जमीनमालक अशा चौघांविरोधात अखेर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महसूल विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फिर्यादी सूरज रमेश चाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सतीश केराम याने मौजा वडगाव (धं) येथील प्लॉट विक्रीस असल्याचे सांगून त्यांची व संजय तरवटकर यांची भेट शैलेश वाकडे यांच्याशी घालून दिली. संबंधित प्लॉट शैलेश वाकडे यांच्या नावावर असल्याचे सांगत सातबारा उतारा, फेरफार नोंदी आणि नकाशा दाखविण्यात आला. विशेष म्हणजे तलाठी रविंद्र उपरे आणि मंडळ अधिकारी राजू डोंगरे यांनीही संबंधित कागदपत्रे खरी असल्याची खात्री दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यानंतर 19 जुलै 2024 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, वणी येथे खरेदीखत नोंदविण्यात आले. यावेळी फिर्यादींकडून एकूण 1 लाख 20 हजार रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे स्वीकारण्यात आली. मात्र काही दिवसांनी प्लॉटची मोजणी करताना धक्कादायक सत्य समोर आले. संबंधित प्लॉट प्रत्यक्षात दीपक भट्टाचार्य यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत विचारणा केली असता संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, फेरफार क्रमांक 1539 हा पूर्णपणे बोगस असून, दाखविण्यात आलेला 2015 मधील व्यवहार प्रत्यक्षात कधीच झालेला नव्हता. महसूल विभागातील चौकशीत ही बाब स्पष्ट झाल्यानंतर गैरप्रकार उघडकीस येण्याची भीती निर्माण झाली. त्यानंतर संबंधित तलाठ्यानेच फेरफार रद्द करण्याचा प्रस्ताव दाखल केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
या प्रकरणाची सुनावणी उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी स्तरावर झाली असून, संबंधित फेरफार व नोंदी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिक फसवणूक झाल्याने अखेर संबंधितांविरोधात वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणामुळे महसूल विभागातील भ्रष्ट कारभार, बनावट फेरफारांचे रॅकेट आणि जमीन घोटाळ्यांचे जाळे पुन्हा एकदा उघड झाले असून, आणखी अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुन्हा दाखल होईपर्यंत पत्रकारांचा ठिय्या आंदोलन
दरम्यान, सुरुवातीला पोलीस प्रशासनाकडून गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत वणी शहरातील पत्रकारांनी थेट पोलीस ठाण्यात चटई टाकून ठिय्या आंदोलन सुरू केले.
“हातर रे ती चटई…!” अशी संतप्त प्रतिक्रिया देत पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेतली. अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतरच पत्रकारांनी आंदोलन मागे घेतले.
या वेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार तसेच आमदार संजय देरकर यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन पत्रकारांशी चर्चा केली व संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली.



