विदर्भ वार्ता। प्रतिनिधी
वणी : “जिथपर्यंत आई आहे, तेव्हापर्यंत मुलीला माया आणि मुलाला बालपण असते. ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो, त्या घरात आनंद नांदतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ वक्ते जंगलु पारखी यांनी केले.
‘माझं गाव माझा वक्ता’ या व्याख्यानमालेच्या ५६ व्या पुष्पात नगर वाचनालय, वणी येथे आयोजित कार्यक्रमात ते “जिच्या हाती पाळण्याची दोरी” या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मातृशक्तीचे महत्त्व अधोरेखित करणारे गीत विजय गंधेवार यांनी सादर केले. आपल्या प्रभावी भाषणात जंगलु पारखी यांनी आईचे प्रेम, त्याग आणि स्त्रीचे कुटुंबातील स्थान यावर भावनिक शब्दांत प्रकाश टाकला. “आई सर्वात आधी उठते आणि सर्वांत उशिरा झोपते, मात्र तिच्या वेदना कुणालाच दिसत नाहीत. स्त्रीचा सन्मान तिच्या जिवंतपणीच व्हायला हवा,” असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात गजानन कासावार यांनी आईचे महत्त्व अधोरेखित करताना, “प्रत्येक मुलाला इतरांपेक्षा नऊ महिने अधिक ओळखणारी व्यक्ती म्हणजे आई. त्यामुळे आईची मूर्ती सर्वांपेक्षा वेगळी आहे,” असे सांगितले. तसेच त्यांनी कवींच्या ओळी उद्धृत करत “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” या भावनेतून आईचे श्रेष्ठत्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अभिजित अणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अशोक सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक व साहित्यप्रेमींची उपस्थिती होती.

