विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वणी पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई करत दोन वाहनांसह 20 लाख 13 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवार (दि. 22 जून) रोजी पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक चौपाटी परिसरात पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, एका काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर वाहनातून तसेच एका मोपेडवर अवैधरित्या दारूची वाहतूक व विक्री केली जात आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून घुग्घूस रोडवर संशयित फॉर्च्युनर (क्र. MH 42 BE 9395) अडवून तपासणी केली. यावेळी वाहनातून विविध कंपनीच्या दारूचा 27 हजार 730 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. वाहनाची किंमत सुमारे 19 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
यानंतर पोलिसांनी दुसऱ्या कारवाईत मोपेड (क्र. MH 29 BB 0308) अडवून तपासणी केली असता, त्यावरील पिशवीतून 6 हजार 240 रुपयांची अवैध दारू आढळून आली. या प्रकरणात भारत प्रमोद टोंगे (रा. शिंदोला, ता. वणी), सुमित उदयभान झुंगे (वय 19) व शुभम अनंता वाघमारे (दोघे रा. लालगुडा, वणी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत दोन वाहने, अवैध दारूचा साठा असा एकूण 20 लाख 13 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोउपनि साजिद सय्यद, पोहेका गजानन सावसाकडे, मारोती पाटील, पुरुषोत्तम डडमल, रितेश भोयर, मनोहर खंडे, नंदकुमार पुप्पलवार, माधव दहिकांबळे, गजानन कुळमेधे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

