ठळक बातम्या

    न्यू झुंबा योगा ग्रुपतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; महिलांच्या आकर्षक योग प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वणी येथील न्यू झुंबा योगा ग्रुपच्या वतीने २१ जून २०२६ रोजी दीनदयाल पार्क येथे मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगाचे विविध प्रकार सादर केले.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी विजयाताई देहेकर यांनी योगाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्रुपच्या प्रमुख किरणताई नळे यांनी गेल्या तीन महिन्यांपासून सहभागी महिलांना योगाचे सखोल प्रशिक्षण व मार्गदर्शन दिल्याची माहिती दिली.

    घरगुती जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेतला. योग दिनानिमित्त महिलांनी एकसमान ड्रेस कोडमध्ये सादर केलेली योग प्रात्यक्षिके उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. त्यांच्या शिस्तबद्ध हालचाली आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने वातावरण प्रेरणादायी बनले.

    न्यू झुंबा योगा ग्रुपच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक, प्रबोधनात्मक आणि आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात. महिलांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य, सामाजिक जाणीव आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबविले जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.

    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भावना पोटदुखे, उमदा शेंडे यांच्यासह ग्रुपमधील सर्व महिलांनी मोलाचे सहकार्य केले. योग दिनाच्या निमित्ताने महिलांनी निरोगी जीवनाचा संदेश देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.




    Photo