ठळक बातम्या

    संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपला; नामदेव अर्जुन तरवटकर यांचे मरणोत्तर नेत्रदान व देहदान

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     वणी/टाकळी : वणी तालुक्यातील टाकळी येथील संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यांच्या मानवतावादी, वैज्ञानिक आणि समाजहिताच्या विचारांचे अनुयायी असलेल्या नामदेव अर्जुन तरवटकर (वय ८६) यांचे शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सकाळी सव्वासात वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मात्र, आपल्या मृत्यूनंतरही समाजसेवेची ज्योत तेवत ठेवत त्यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदान करून मानवतेचा एक आदर्शवत संदेश समाजापुढे ठेवला.

    निधनापूर्वी नामदेवराव यांनी आपले नेत्र आणि देह वैद्यकीय शिक्षण व समाजहितासाठी दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या अंतिम इच्छेचा सन्मान राखत पुत्र रवींद्र नामदेव तरवटकर, सून सौ. कोकीळा तरवटकर तसेच कन्या गीता शिरपूरकर, लता भोस्कर व नीता शिरपूरकर यांनी तत्परतेने पुढाकार घेत नेत्रदान व देहदानाची प्रक्रिया पूर्ण केली.

    डॉ. अमोल बुटले (विसापूर) यांना माहिती देण्यात आल्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप अडकिने यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूरच्या शरीररचना शास्त्र विभागाशी तसेच सर्वोपचार रुग्णालयाच्या नेत्रदान विभागाशी समन्वय साधला. सर्वोपचार रुग्णालयाचे नेत्रदान समन्वयक योगेंद्र इंदुरकर व त्यांच्या चमूने नेत्रदानाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचना शास्त्र विभागाचे डॉ. कुलेश चांदेकर व सहकाऱ्यांनी देहदानाची प्रक्रिया पूर्ण केली.

    या कार्यात जावई श्याम आंबीलकर, नात अश्विनी आंबीलकर, नातू शुभम तरवटकर, जावई विनोद शिरपूरकर, महादेव भोस्कर, मनोज शिरपूरकर, गुलाबराव मुके, शामराव मुके, विलास नांदे, विनोद नांदे, दाणेबाई नांदे, अजाबराव वाघमारे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

    यानंतर शेतकरी संघटनेचे नेते देवराव धांडे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ बोबडे यांनी केले. यावेळी प्रदीप अडकिने व डॉ. अमोल बुटले यांनी नेत्रदान व देहदानाचे महत्त्व पटवून देत उपस्थितांना या समाजोपयोगी कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच नांदे साहेब (घुग्गुस) व जगन्नाथ टोंगे गुरुजी यांनी नामदेवराव यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या साधेपणा, समाजसेवा आणि मानवतावादी विचारांना उजाळा दिला.

    संत गाडगेबाबा यांनी अंधश्रद्धा, रूढी-परंपरा यांना छेद देत स्वच्छता, शिक्षण व समाजसेवेचा संदेश दिला, तर संत तुकडोजी महाराजांनी "मानव सेवा हीच ईश्वर सेवा" हा विचार जनमानसात रुजवला. नामदेव अर्जुन तरवटकर यांनी आपल्या कृतीतून या दोन्ही संतांच्या विचारांचे जणू मूर्तिमंत उदाहरण घालून दिले. मृत्यूनंतरही इतरांना प्रकाश देणारे नेत्रदान आणि वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान करून त्यांनी समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

    त्यांच्या या महान कार्याची परिसरात सर्वत्र प्रशंसा होत असून, समाजात नेत्रदान व देहदानाबाबत जनजागृती निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे.

    मानव समाजासाठी संदेश :

    "माणूस आयुष्यभर जेवढे जगतो त्यापेक्षा तो समाजासाठी काय देऊन जातो हे अधिक महत्त्वाचे असते. नेत्रदानाने एखाद्याला नवी दृष्टी मिळते, तर देहदानाने वैद्यकीय शिक्षणाला दिशा मिळते. संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांनी शिकविलेली मानवसेवा, विवेक आणि समाजहिताची भावना आपण कृतीतून जपली तरच त्यांना खरी आदरांजली ठरेल. मृत्यूनंतरही इतरांच्या जीवनात प्रकाश पेरणे, यापेक्षा मोठे दान नाही."

    ....... विदर्भ वार्ता / पत्र पोर्टल न्यूज वणी चे संपादक 

    संजय एल चिंचोलकर कडून स्वर्गवासी नामदेव अर्जून तरवटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

    Photo