विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाच्या छायेत सापडले आहेत. रोहिणी व मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांच्या उगवणीवर विपरीत परिणाम झाला असून अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कापूस आदी पिकांची पेरणी केली होती. सुरुवातीच्या तुरळक पावसामुळे पेरणीला वेग आला; मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला. परिणामी अनेक ठिकाणी बियाण्यांची उगवण झाली नाही, तर काही ठिकाणी उगवलेली पिकेही कोमेजण्याच्या स्थितीत आहेत.
महागडे बियाणे, रासायनिक खते, मशागतीचा वाढता खर्च आणि मजुरी यावर मोठी गुंतवणूक करूनही पावसाअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करावी लागणार असून त्यामुळे आर्थिक भार आणखी वाढणार आहे.
हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी प्रत्यक्षात पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकरी वर्ग शासनाकडे आशेने पाहत असून, पावसाअभावी झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, अनुदान व दुबार पेरणीसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या शेतकऱ्यांचे सर्व लक्ष आकाशाकडे लागले असून, येणारा पाऊसच त्यांच्या खरीप हंगामाचे भवितव्य ठरविणार आहे. सरकारने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.


