विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : सुदृढ शरीर आणि संतुलित मनाच्या क्षमता विकासासाठी भारतीय संस्कृतीने शोधलेला आणि अंगीकारलेला सुंदरतम मार्ग म्हणजे योग. आज जागतिक पातळीवर महत्व सिद्ध झालेल्या योग विषयक जागृतीसाठी शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहामध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग आणि योग प्रशिक्षण विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी नामदेवराव जेनेकर, नंदकुमार गुरूकर, राजकुमार पाचभाई आणि सौ. अनुराधा हूड या योगशिक्षकांनी उपस्थित त्यांना योगाचे महत्त्व सांगून महत्त्वपूर्ण योगिक क्रिया आणि प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करवून घेतले.
महाविद्यालयाचे या सर्व विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सोबत विविध वणीकर गणमान्य व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. होमराज पटेलपैक यांनी योगशिक्षकांचे स्वागत केले तर प्रास्ताविक डॉ. नीलिमा दवणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ विकास जुनगरी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. किशन घोगरे यांनी केले.


