विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
चंद्रपूर : डेबू सावली वृद्धाश्रम, देवाडा (चंद्रपूर) चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. सुभाषभाऊ शिंदे आणि आदरणीय सौ. भारतीताई शिंदे यांचा खालसा फाउंडेशनतर्फे नुकताच सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. हा गौरव केवळ शिंदे दाम्पत्याचा नसून संपूर्ण मानवतावादी विचारसरणी आणि समाजसेवेसाठी समर्पित असलेल्या कार्याचा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा जपत शिंदे दाम्पत्य अनेक वर्षांपासून निराधार, वृद्ध, दुःखी आणि गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहे. समाजातील उपेक्षित घटकांना मायेची ऊब, आधार आणि सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे.
त्यांचे मानवतावादी विचार, सेवाभावी वृत्ती आणि समाजहिताची तळमळ त्यांच्या प्रत्येक कृतीतून सातत्याने दिसून येते. निराश्रितांच्या मदतीसाठी धावून जाणे, समाजातील अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा आणि नकारात्मकतेविरुद्ध जनजागृती करणे तसेच सकारात्मक सामाजिक परिवर्तनासाठी मार्गदर्शन करणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे.
खालसा फाउंडेशनने केलेला हा सत्कार म्हणजे त्यांच्या अथक परिश्रमांची, निःस्वार्थ समाजसेवेची आणि मानवतेसाठी दिलेल्या योगदानाची पावती असल्याचे मानले जात आहे. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या कार्याचा गौरव हा समाजसेवेच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण सन्मान मानला जात आहे.
विदर्भ वार्ता /पत्र पोर्टल न्यूज चॅनल वणी कडून अभिनंदन.



