शेतकरी, महिला, युवक व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार; पत्रकार परिषदेत घोषणा
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : १७ जून : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जनतेच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ जुलै २०२६ रोजी वणी येथे भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात वणीतील वसंत जिनिंग येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर तसेच यवतमाळ जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शासन व प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात जनतेच्या भावना व्यक्त करत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, शेतकरी, शेतमजूर, महिला, बेरोजगार युवक, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. विविध निवेदने, आंदोलने आणि बैठका घेऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने आता जनतेच्या आवाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील अडचणी, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या समस्या, पीक विमा, खत वितरण, वाढते इंधन दर, बेरोजगारी, बिघडलेली पाणीपुरवठा व्यवस्था, अमृत योजनेतील कथित अनियमितता, वाढता गुन्हेगारी व मादक पदार्थांचा प्रश्न, तसेच रेल्वे उड्डाणपूल आणि सुरक्षित सर्व्हिस रोडची मागणी यासारख्या विविध विषयांवर आवाज उठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय स्मार्ट मीटर सक्ती, रस्त्यांची दुरवस्था, रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, स्थानिक युवकांना रोजगार आणि प्रशासनातील कथित भ्रष्टाचार यांसारख्या मुद्द्यांनाही मोर्चात प्राधान्याने स्थान दिले जाणार आहे.
यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाने जनतेच्या प्रश्नांकडे वेळेत लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. हा मोर्चा केवळ आंदोलन नसून अन्याय, भ्रष्टाचार आणि जनविरोधी धोरणांविरोधातील लोकशाही मार्गाने दिलेला इशारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१ जुलै रोजी वणीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन जनआक्रोश मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.



