विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : शहरातील शाम टॉकीज बिट परिसरातील वरोरा नाक्याजवळ वणी पोलिसांनी अवैध देशी दारू वाहतुकीवर कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेत तब्बल १ लाख ३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १७ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.४० ते ७.१० वाजताच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान श्रीनिवास चंदय्या कंकडवार (वय ५०, रा. वार्ड क्र. २, मांजरी, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) याच्या ताब्यातील मोटारसायकलची तपासणी करण्यात आली. यावेळी गाडीच्या डिक्कीवरील बॅगमध्ये रॉकेट देशी दारू (संत्रा कंपनी) ९० एम.एल. क्षमतेच्या ९५ शिश्या आढळून आल्या.
जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ३,६०० रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली हिरो होंडा सुपर स्प्लेंडर मोटारसायकल अंदाजे १ लाख रुपये किमतीची आहे. अशा प्रकारे एकूण १,०३,६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नापोका विशाल मोहन राठोड करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका अविनाश चिक्राम व नापोका विशाल राठोड यांनी केली.
