ठळक बातम्या

    वणी पोलिसांची बार, वाईन शॉप व रेस्टॉरंट चालकांसोबत बैठक; नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच मद्यविक्री व्यवसाय नियमांनुसार चालविण्यात यावा यासाठी वणी पोलिसांनी बार, रेस्टॉरंट, वाईन शॉप आणि बिअर शॉप चालकांची विशेष बैठक आयोजित केली. ही बैठक मंगळवारी सायंकाळी ७.३० ते ८.१५ वाजेदरम्यान पोलीस स्टेशन वणी येथे पार पडली. बैठकीस एकूण १७ व्यावसायिक उपस्थित होते.

    बैठकीदरम्यान पोलीस निरीक्षकांनी व्यवसायिकांना विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. निर्धारित वेळेपूर्वी किंवा वेळेनंतर व्यवसाय सुरू ठेवू नये, १८ वर्षांखालील व्यक्तींना मद्यविक्री करू नये, तसेच बार व रेस्टॉरंट परिसरात किमान एक महिन्याचा सीसीटीव्ही बॅकअप उपलब्ध असलेली यंत्रणा बसविण्याचे निर्देश देण्यात आले.

    याशिवाय, व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्यास सांगण्यात आले. तसेच, आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती नोंदवहीत अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

    या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वणी पोलिसांकडून देण्यात आला.

    या बैठकीमुळे शहरातील मद्यविक्री व्यवसायांवर अधिक प्रभावी नियंत्रण राहण्यास मदत होणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी घेतलेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

    Photo