विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : शहरालगतच्या गणेशपुर येथे एका ३८ वर्षीय चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सहारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत सुरेश सहारे (वय ३८) हे गणेशपुर येथे आपल्या कुटुंबासह राहत होते. ते खाजगी वाहन चालक म्हणून काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवारी घरातील इतर सदस्य बाहेर गेल्याने ते घरी एकटेच होते. याच दरम्यान त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.
कुटुंबीय घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. मेहनती, शांत आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारे म्हणून प्रशांत सुरेश सहारे यांची ओळख होती. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने सहारे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
वाढत्या आत्महत्यांच्या घटनांवर संदेश
"जीवनात कितीही मोठे संकट आले तरी आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही. प्रत्येक अडचणीला पर्याय असतो, प्रत्येक वेदनेला आधार असतो. मनातील दुःख, ताणतणाव किंवा नैराश्य एकट्याने सहन न करता कुटुंबीय, मित्र किंवा विश्वासू व्यक्तींशी मनमोकळेपणाने संवाद साधा. एक क्षणाचा चुकीचा निर्णय संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभराचे दुःख देऊन जातो. जीवन अमूल्य आहे—बोला, मदत मागा आणि आशा सोडू नका."
"समस्या तात्पुरत्या असतात, पण जीवन अनमोल असते."

