विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : "रोग आणि विकार यामध्ये फरक असतो. रोगामध्ये औषध घेता येते पण चुकीच्या आचरणामुळे आणि अयोग्य सवयीमुळे शरीराच्या हाडांमध्ये आणि स्नायूंमध्ये जे दोष निर्माण होतात ते केवळ औषधाने दूर होत नसून अशा विकारांनी परावलंबी झालेल्या रुग्णांना स्वावलंबी करणे हे फिजिओथेरपीचे मूळ उद्दिष्ट आहे. केवळ समस्या आल्यानंतर नव्हे तर त्या कधी येऊ नये या दृष्टीने हे शास्त्र आपल्याला मार्गदर्शन करते त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून यातील विविध पैलू समजून घ्यायला हवेत. " असे विचार सुप्रसिद्ध फिजिओथेरपी तज्ञ डॉ. अरुंधती सचिन उपरे यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगरवाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्यात आयोजित होत असलेल्या "माझं गाव माझा वक्ता" या वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यानमालेत ५८ वे पुष्पगुंतांना, मानवी जीवनात फिजिओथेरपी चे महत्व या विषयावर त्या व्यक्त होत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. अभिजित अणे तथा नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आरंभी सरस्वती पूजन झाल्यानंतर विजय गंधेवार यांनी आनंद या जीवनाचा... हे गीत सादर केले. प्रास्ताविकामध्ये स्वानंद गजानन पुंड यांनी व्याख्यानमालेचा इतिहास आणि त्यातील सातत्य यावर प्रकाश टाकला.
आपल्या अत्यंत संयत, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी व्याख्यानामध्ये डॉ. अरुंधती उपरे यांनी फिजिओथेरपी चा इतिहास, प्राचीन भारतात सुश्रुत संहितेतील त्याचे शरीरचेष्टा स्वरूपातील वर्णन, आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणारे विकार, दुखापत, अपघात, विविध ऑपरेशन्स नंतर असणारी उपयुक्तता, खेळाडूंच्या जीवनात असणारे महत्त्व, जलचिकित्सापद्धती इ. विविध विषयांवर सविस्तर उद्बोधन केले.
व्याख्यानानंतर श्रोतृ वर्गातून आलेले विविध प्रश्न आणि त्यांना आत्मविश्वासपूर्ण शैलीत दिलेली शास्त्रीय उत्तरे हे व्याख्यानाचे वैशिष्ट्य ठरले.
गजानन कासावार यांनी व्याख्यानमालेसाठी पूर्व सचिव अभिजित अणे यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करीत या विषयावर पुस्तक प्रकाशित व्हावी अशी इच्छा प्रकट केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अभिजित अणे यांनी स्वतःच्या बदलत्या भूमिकेचा विचार मांडत कष्टाचे फळ प्राप्त होत असल्याचे सांगितले. पुस्तक प्रकाशाची ग्वाही देत नवनवीन श्रोत्यांनी सभागृह भरल्या विषयी आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित सचिव राजेश महाकुलकर यांनी तर आभार प्रदर्शन सहसचिव गजानन भगत यांनी केले. सदस्या लताताई पांडे यांच्या हस्ते वक्त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, राम मेंगावार ,प्रमोद लोणारे, आणि कविता राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.


