ठळक बातम्या

    वेकोली-मुंगोली कोलमाईनग्रस्तांच्या प्रश्नांवर ९ जुलैला रास्ता रोको; विजय पिदुरकर यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : वेकोली वणी एरिया अंतर्गत कोलगाव-मुंगोली कोळसा खाण प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी ९ जुलै २०२६ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी उपविभागीय अधिकारी, वणी यांना दिलेल्या निवेदनातून दिली आहे.

    निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कोळसा उत्खनन व वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून धूळप्रदूषण, जमिनीचे अधिग्रहण, स्थानिकांना रोजगार, पुनर्वसित गावांतील अपुऱ्या सुविधा, पर्यावरणीय हानी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर झाले आहेत. या संदर्भात अनेकदा प्रशासन व वेकोलीकडे तक्रारी करूनही ठोस कार्यवाही न झाल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

    ९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता कोलगाव चेकपोस्ट परिसरात प्रमुख मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, समस्या सुटेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

    आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये कोलगाव चेकपोस्ट ते कोलगाव फाटा रस्त्याची तातडीने दुरुस्ती, कोलगाव पुनर्वसन मार्गाचे मजबुतीकरण, कोलगाव फाटा ते भीमनगर-मुंगोली मार्गाचे रुंदीकरण, स्थानिक युवकांना कंत्राटी कामात प्राधान्य, शिवणी परिसरातील रस्त्यांचे सिमेंटीकरण, धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी मारणे, पैनगंगा व मुंगोली पुलांजवळ सुरक्षित रस्त्यांची उभारणी, स्ट्रीटलाईटची व्यवस्था, पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्रक्रियांवर नियंत्रण तसेच कोळसा वाहतुकीसाठी सुरक्षित पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    वाढत्या अपघातांमुळे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व वाहनचालकांचे जीव धोक्यात असल्याचे नमूद करत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वेकोलीमार्फत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विजय पिदुरकर यांनी केली आहे. तसेच या आंदोलनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.



    Photo