"झाडे लावा, पर्यावरण वाचवा; निसर्ग टिकला तरच मानवाचे आयुष्य सुरक्षित राहील" — महिलांचा संदेश
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी: दि. २९ जून वणी शहरातील छोरिया लेआउट येथील 'सेवन रो हाऊस' परिसरातील महिलांनी यंदाची वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीला पर्यावरणपूरक दिशा देत साजरी केली. वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्याऐवजी परिसरात विविध वृक्षांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारत समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
यावेळी महिलांनी सांगितले की, केवळ धार्मिक विधी केल्याने आयुष्य वाढत नाही. निसर्गाचे संवर्धन, वृक्षारोपण आणि त्यांचे जतन केल्यानेच शुद्ध हवा, संतुलित पर्यावरण आणि निरोगी जीवन मिळू शकते. म्हणून प्रत्येकाने वटपौर्णिमेसारख्या सणांच्या निमित्ताने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा.
या उपक्रमात वैष्णवी ठाकरे, संगीता टेंभुर्डे, अर्चना मुजगेवार, अश्विनी रामगिरवार, दामिनी बल्की, स्नेहा नागतुरे यांच्यासह परिसरातील अनेक महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाची शपथ घेत त्यांनी इतर नागरिकांनाही पर्यावरण रक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
महिलांच्या या सामाजिक जाणीवेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आजच्या काळात नितांत आवश्यकता असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
पर्यावरण संदेश :
"एक झाड म्हणजे एक जीवन. आज लावलेले झाड उद्याच्या पिढीला शुद्ध हवा, पाणी आणि सुरक्षित भविष्य देईल. सण-उत्सवांचा खरा आनंद निसर्ग जपण्यात आहे. चला, प्रत्येकाने एक झाड लावूया, त्याचे संगोपन करूया आणि हरित, निरोगी भारत घडवूया."



