विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : दि. ३० जून २०२६ : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जनता विद्यालय, वणी येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, गुलाबपुष्प व टाळ्यांच्या गजरात आनंदाने स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला नगर परिषद, वणीच्या नगराध्यक्षा सौ. विद्याताई सचिन आत्राम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच महिला व बालकल्याण सभापती सौ. रिताताई महेश पहापळे आणि नगरसेवक श्री. राजूभाऊ भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मंगलाताई जोगी होत्या. यावेळी पर्यवेक्षक श्री. भगवान पाचभाई, श्री. घुगुल सर मुख्याध्यापक लोकप्रिय विद्यालय पेटूर,सकाळ पाळी प्रमुख श्री. जयप्रकाश गोरे तसेच दुपार पाळी प्रमुख श्री. प्रमोद पोडे यांची उपस्थिती लाभली.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण, शिस्त, स्वच्छता, संस्कार, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि दैनंदिन शाळेत उपस्थित राहण्याचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि आनंददायी वातावरणात त्यांच्या शालेय जीवनाची सुरुवात व्हावी, या उद्देशाने विविध स्वागतपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरीत्या केले.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन श्री. मनोज खीरटकर यांनी केले, तर श्री. गजेंद्र काकडे यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या प्रवेशोत्सवामुळे नवागत विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाची आनंददायी व प्रेरणादायी सुरुवात झाली.



