ठळक बातम्या

    वणीत ९ जूनपासून विशेष अतिक्रमण हटाव मोहीम; नागरिकांच्या सोयीसाठी नगरपरिषदेची कडक भूमिका

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येला आळा घालण्यासाठी वणी नगरपरिषदेने ९ जून २०२६ पासून विशेष अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्ते, फुटपाथ तसेच वाहनतळासाठी राखीव जागांवर अतिक्रमण झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे.

    फुटपाथवरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे. तसेच पार्किंगच्या जागांवर व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्याने वाहनधारकांना वाहन उभी करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

    नगरपरिषद प्रशासनाने शहरातील सर्व व्यावसायिक, दुकानदार आणि अतिक्रमणधारकांना स्वखुशीने आपले अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा नियमानुसार दंडात्मक कारवाईसह अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

    मात्र, केवळ कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, तर शहरातील सार्वजनिक जागांचे संरक्षण आणि नागरिकांना सुरक्षित व सुलभ सुविधा उपलब्ध करून देणे ही नगरपरिषदेचीही जबाबदारी आहे. त्यामुळे अतिक्रमण हटावल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी सातत्याने देखरेख ठेवणे, नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था उभारणे आणि फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे ठेवणे आवश्यक आहे.

    शहराच्या विकासासाठी आणि सुव्यवस्थेसाठी प्रशासन व नागरिक यांनी परस्पर सहकार्य करणे गरजेचे आहे. स्वच्छ, सुंदर आणि वाहतुकीला सुलभ वणी शहर घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.



    Photo