विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने वणी-पांढरकवडा परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा संयोजक श्री. पवन राम एकरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या अभियानात २४ मंडळांमध्ये एकूण ३१ विविध उपक्रम पार पडले असून त्यापैकी २९ उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत.
या उपक्रमांतर्गत शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक स्थळे, मंदिर परिसर तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांना झाडे लावण्याचे आणि त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.
"पर्यावरणाचे संरक्षण, भविष्याची हमी" या संकल्पनेवर आधारित या मोहिमेत कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वणी शहर, वणी ग्रामीण, पांढरकवडा, झरी, आर्णी, राळेगाव, मारेगाव, केळापूर, पाटणबोरी यांसह विविध मंडळांमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
यावेळी श्री. पवन एकरे यांनी सांगितले की, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे. पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेल्या या मोहिमेला समाजातील सर्व घटकांचा मिळणारा प्रतिसाद प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहभागी नागरिकांचे अभिनंदन करण्यात आले. "झाडे लावा... पर्यावरण वाचवा... भविष्य घडवा!" हा संदेश देत अभियानाचा समारोप करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनासाठी भाजपचा पुढाकार; नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद, वृक्षारोपणातून हरित भविष्याचा संकल्प.



