विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : स्थानिक पत्रकार तथा साप्ताहिक मुक्त ललकारचे संपादक प्रवीण दिवाणचंद शर्मा (वय ४८) यांचे शुक्रवार, दि. २६ जून रोजी आजारपणामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच वणी शहरासह पत्रकारिता, सामाजिक व विविध क्षेत्रांत शोककळा पसरली.
स्व. प्रवीण शर्मा हे अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. साप्ताहिक मुक्त ललकारच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रश्न, जनहिताचे विषय तसेच स्थानिक समस्यांना सातत्याने वाचा फोडत निर्भीड, निष्पक्ष आणि जनसरोकारांची पत्रकारिता केली. त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, अभ्यासू वृत्ती आणि समाजाभिमुख भूमिकेमुळे त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या मनमिळावू, सहकार्यशील आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या स्वभावामुळे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांमध्ये त्यांचा मोठा स्नेहसंबंध होता. त्यांच्या अकाली निधनामुळे वणीच्या पत्रकारिता क्षेत्राची मोठी व अपूरणीय हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
अनेक पत्रकार, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी स्व. शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे.
पत्रकार मित्र परिवारातर्फे स्व. प्रवीण दिवाणचंद शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, हीच प्रार्थना.
