विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी: साहित्य विषयक विविध उपक्रमांच्या माध्यमातून या क्षेत्रात रूची असणाऱ्यांना एक सुयोग्य व्यासपीठ आणि श्रोत्यांना सशक्त साहित्याची मेजवानी घडावी या दृष्टीने निर्माण करण्यात आलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या वणी शाखेच्या नुकत्याच झालेल्या आमसभेमध्ये २०२६ ते २०३१ या कालावधी करीता डॉ. अभिजित रमेशराव अणे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यापूर्वी त्यांनी वणी शाखेचे सचिव म्हणून पंधरा वर्षे जबाबदारी सांभाळली होती. या कालावधीमध्ये जिल्हा साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन यांच्या भव्य आयोजनाच्या सोबतच गेल्या ५७ महिन्यांपासून सलग सुरू असलेल्या "माझं गाव माझा वक्त्ता " या विक्रमी व्याख्यान मालिकेची कल्पना आणि संयोजन ही त्यांच्या कार्यकाळातील विशेष उपलब्धी होय.
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे इंग्रजी विभाग प्रमुख स्वरूपात कार्यरत असणाऱ्या डॉ. अणे यांनी विद्यार्थी विकास विभागाच्या द्वारे विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले असून विद्यापीठ स्तरावरील चमूंचे संयोजक स्वरूपात त्यांना दोन वेळा कलरकोटचा सन्मान प्राप्त झालेला आहे.
हिंगणा येथे झालेल्या ६७ व्या विदर्भ साहित्य संमेलनातील परिसंवादात तथा वर्धा येथे झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादात त्यांनी आमंत्रित वक्ता स्वरूपात सहभाग नोंदविलेला आहे.
त्यांच्या सचिव पदाच्या कार्यकाळात वणी शाखेला २०१७ मध्ये विदर्भ साहित्य संघाची उत्कृष्ट शाखा म्हणून पुरस्कार प्राप्त झालेला आहे हे विशेष उल्लेखनीय.

