विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी: वणी येथील वन विभागाच्या कार्यालय परिसरात दोन पिंजऱ्यांच्या मधोमध एका कुत्र्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दुर्गंधी पसरल्यानंतर ही बाब उघडकीस आल्याने वन विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जबाबदार शासकीय कार्यालयाच्या आवारात मृत प्राणी अनेक दिवस पडून राहणे आणि त्याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी न घेणे, हा गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतरच हा प्रकार समोर आल्याने कार्यालयीन देखरेख, नियमित तपासणी आणि स्वच्छता व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब कशी आली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पिंजऱ्यांच्या परिसरात नियमित गस्त, तपासणी व स्वच्छता केली जात असती तर अशी वेळ आली नसती, असेही बोलले जात आहे.
मृत प्राण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून आरोग्यविषयक उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
या घटनेमुळे वन विभागातील कामकाजातील ढिसाळपणा आणि दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. सरकारी कार्यालयाच्या आवारात मृत प्राणी सडत राहणे आणि त्याकडे वेळेत लक्ष न देणे हे कर्तव्यातील कसूर मानले जात असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय अथवा कायदेशीर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

