विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी (दि. २० जून) कॉकरोज जनता पार्टीच्या वतीने NEET पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आयोजित या आंदोलनात अनेक विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी NEET पेपर लीक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि त्यांच्या कुटुंबांच्या अपेक्षांशी खेळ करणाऱ्या दोषींना कोणतीही माफी मिळता कामा नये. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पारदर्शक, सुरक्षित आणि सक्षम परीक्षा प्रणाली उभारण्याची गरज आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचीही मागणी केली. "शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे, कुणाची कृपा नाही. पेपर लीक बंद करा, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा", अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
हे आंदोलन पूर्णपणे शांततेच्या मार्गाने करण्यात आले असले तरी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांची मेहनत, गुणवत्ता आणि प्रामाणिकपणाच त्यांच्या भविष्याचा आधार ठरावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
सरकारसाठी संदेश
"विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता टिकवणे ही सरकारची जबाबदारी आहे. पारदर्शक परीक्षा प्रणाली निर्माण करून विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा जिंका."
विद्यार्थ्यांसाठी संदेश
"संघर्ष आणि मेहनत कधीही वाया जात नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, पण शिक्षणावरील विश्वास गमावू नका. तुमची जिद्द, प्रामाणिकपणा आणि मेहनतच तुमच्या उज्ज्वल भविष्यातील खरी ताकद आहे."





