ठळक बातम्या

    संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य मोफत आरोग्य शिबिर; ५४५ रुग्णांची तपासणी, ९३ जणांची नेत्रशस्त्रक्रियेसाठी निवड

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : शिवसेना नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून व लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत आरोग्य शिबिर सोमवारी जैताई मंदिर परिसरात उत्साहात व यशस्वीपणे पार पडले.

    सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आयोजित या शिबिराला वणी, मारेगाव, झरी तसेच परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात एकूण ५४५ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९३ रुग्णांची नेत्रशस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.

    जनसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात जनरल फिजिशियन, शस्त्रक्रिया, बालरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, स्त्रीरोग तसेच त्वचारोग तज्ज्ञांनी रुग्णांची सखोल तपासणी केली. गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले तसेच आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनही करण्यात आले. नेत्र तपासणीनंतर पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्मे देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

    शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूर येथील डॉक्टर व वैद्यकीय पथकाचा यवतमाळ जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

    या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी जिल्हा संघटक विजय चोरडिया, सुधाकर गोरे, दीपक कोकास, आशिष खुळसंगे, विनोद मोहितकर, किशोर नांदेकर, उमेश वैरागडे, शुभम गोरे, बाळू चेडे, विशाल किन्हेकर, प्रसाद ठाकरे, हिमांशू बोहरा, राहुल पारखी, संगीता मुरस्कर, मनीषा कोंगरे, वसुधा ढगे, भाग्यश्री वैद्य, प्रणोती बांगडे, सौ. पुरी यांच्यासह शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध व्यवस्था सांभाळत शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

    या आरोग्य शिबिरामुळे शेकडो गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, मोफत औषधे आणि पुढील उपचाराची संधी मिळाल्याने नागरिकांनी आयोजकांचे मनापासून कौतुक केले.

    सामाजिक कार्याचा संदेश :

    "समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा. गरजूंना वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे केवळ एक उपक्रम नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. निरोगी समाज घडविण्यासाठी अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन ही काळाची गरज असून प्रत्येकाने सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन 'सेवा हाच धर्म' ही भावना जपली पाहिजे."











    Photo