विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी: येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 7 मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तक वाटप करण्यात आले.
सर्वप्रथम इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बँड पथकाच्या गजरात वणी नगर परिषदेच्या अध्यक्षा विद्याताई आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर चांदेकर , मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी पुष्पवर्षाव करून हार घालून प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
शनवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आल्या नंतर प्रवेशोत्सव मेळावा 2 चे उद्घाटन नगराध्यक्षा विद्याताई आत्राम यांनी केले. या प्रसंगी राकेश बुग्गेवार व किशोर चांदेकर उपस्थित होते. यावेळी पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची मानसिक, शारीरिक व बौद्धिक क्षमता चाचणी घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचा स्तर निश्चित करण्यात आले. त्यानंतर वर्ग 1 ते 7 वी च्या उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्थकांचे अतिथींच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना विद्याताई आत्राम यांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येऊन शाळेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. राकेश बुग्गेवार यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करून पुढील वर्षभरात घेण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती देऊन त्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवीधर शिक्षक चंदू परेकर यांनी केले. सूत्रसंचालन विजय चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन दिगंबर ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर, सौरभ बहादे यांनी केले.


