विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीला गेलेली बकरी आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल अवघ्या काही तासांत जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात वणी पोलिसांना यश आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विजय लक्ष्मण शिंदे यांनी २८ जून रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये दीपक चौपाटी परिसरात शेळ्या-बकऱ्या चारत असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या कळपातील एक बकरी चोरून मोटारसायकलवरून पळवून नेल्याचे नमूद केले होते.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन व्यक्ती चोरीची बकरी विक्रीसाठी भीमनगर परिसरात आले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून विकेश मनोहर साळुंके (वय २८) व अरुण मारोती गवते (वय ३४), दोघेही रा. गोकुळ नगर, वणी यांना ताब्यात घेतले.
तक्रारदारांना बोलावून बकरीची ओळख पटविण्यात आली असता ती चोरीला गेलेलीच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून चोरीची बकरी तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त केली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. साजिद सय्यद, पोहेकॉ. गजानन सावसाकडे, पोका. मोनेश्वर खडसे, पोका. नंदकुमार पुष्पलवार व पोका. गणेश मेश्राम यांनी केली.

