विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वेकोलीच्या मुंगोली व कोलगाव खाण परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या पर्यावरण व मानववस्तीला घातक ठरत असलेल्या प्रोसोपिस (विलायती बाभूळ) झाडांचे समूळ उच्चाटन करण्यात यावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी उपविभागीय अधिकारी (महसूल), वणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वेकोलीकडून मागील अनेक वर्षांपासून पर्यावरण पुनर्स्थापनेच्या नावाखाली प्रोसोपिसची लागवड करण्यात आली. मात्र हे परदेशी आक्रमक झाड स्थानिक जैवविविधतेसाठी घातक ठरत असून, भूजलाचे मोठ्या प्रमाणात शोषण करत आहे. तसेच या झाडांमुळे परिसरातील शेती, वनस्पती आणि स्थानिक वृक्षांच्या वाढीवरही विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय या झाडांच्या दाट वाढीमुळे वन्यप्राण्यांचा वावर वाढून नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकदा रस्त्यांवर वन्यप्राणी दिसत असल्याने अपघात व जीवितहानीची शक्यता वाढली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वीही या संदर्भात सूचना दिल्या होत्या, मात्र अद्याप प्रभावी कारवाई झालेली नाही. त्यामुळे पर्यावरणाला घातक ठरत असलेली प्रोसोपिसची झाडे तातडीने हटवून त्यांच्या जागी स्थानिक व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्याचे निर्देश वेकोली प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी विजय पिदुरकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

