विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
यवतमाळ : अमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत यवतमाळ जिल्हा पोलिस दलाने मोठी कारवाई करत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल ८८५.१९५ किलो गांजा नष्ट केला. या गांजाची अंदाजे बाजारपेठेतील किंमत १ कोटी ७५ लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
एनडीपीएस कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या २२ गुन्ह्यांमधील जप्त गांजा सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून २ जुलै २०२६ रोजी नागपूर येथील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात ड्रग डिस्पोजल कमिटीच्या उपस्थितीत भस्म करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी यवतमाळ पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा हा महत्त्वाचा भाग असून, अशा प्रकारच्या कारवायांमुळे अमली पदार्थांविरोधातील पोलिसांचा कठोर संदेश समाजात पोहोचत आहे.



