ठळक बातम्या

    वणी पोलिसांची जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई; एकाच दिवशी तीन वरळी मटका प्रकरणे उघड, तिघांवर गुन्हे दाखल

     

    विदर्भवार्ता । प्रतिनिधी 

    वणी : वणी पोलिसांनी शहरातील विविध भागांत धडक कारवाई करत वरळी मटका जुगार चालविणाऱ्यांविरुद्ध एकाच दिवशी तीन स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवाईत तिघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12(अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून रोख रक्कम, मटका पट्टी, कार्बन पेपर व लेखन साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    पहिल्या कारवाईत भाजीमंडी येथील नगर परिषद शौचालय परिसरात अश्पाक खान अब्बास खान (वय 38, रा. मोमीनपुरा, वणी) हा लोकांकडून पैसे घेऊन वरळी मटक्याचे आकडे लिहिताना आढळून आला. पोलिसांनी पंचांसमक्ष केलेल्या अंगझडतीत त्याच्याकडून 1,740 रुपये रोख, मटका पट्टी, कार्बन पेपर व डॉट पेन असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश मेश्राम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. गजानन सावसा करीत आहेत.

    दुसऱ्या कारवाईत ज्योती बारच्या गल्लीत संजय शंकर गौरकार (वय 52, रा. सावरकर चौक, वणी) हा सार्वजनिक ठिकाणी वरळी मटका खेळ चालविताना आढळला. त्याच्याकडून मटका पट्टी बुक, कार्बन पेपर, डॉट पेन व 720 रुपये रोख जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलीस शिपाई लोकेश मसराम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास नापोका विशाल राठोड करीत आहेत.

    तिसऱ्या कारवाईत ब्राम्हणी फाटा परिसरातून सतीश प्रभाकर जोशी (वय 57, रा. बीएसएनएल कार्यालयाजवळ, वणी) याला वरळी मटका जुगार चालविताना पकडण्यात आले. त्याच्याकडून जुगाराच्या चिठ्ठ्या, डॉट पेन व 700 रुपये रोख जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोउपनि प्रवीण हिरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास नापोका विशाल राठोड करीत आहेत.

    वणी पोलिसांच्या या सलग कारवायांमुळे शहरातील अवैध जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



    Photo