विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी :वणी–शिरपूर–ढाकोरी–बोरी–कोरपना मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा, यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता सकारात्मक दिशा मिळताना दिसत आहे. या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यास यवतमाळ आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे तसेच महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश ही दोन राज्ये अत्यंत कमी अंतराने जोडली जाणार असून, या परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
या मागणीसंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या प्रस्तावाची दखल घेत उत्तर पाठविले असून, नव्या राष्ट्रीय महामार्गांच्या घोषणेसंदर्भातील धोरण अंतिम झाल्यानंतर या प्रस्तावावर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग, पांढरकवडा यांनीही वणी–शिरपूर–ढाकोरी–बोरी–कोरपना मार्ग राष्ट्रीय महामार्ग श्रेणीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर सादर केला असल्याचे पत्रातून स्पष्ट झाले आहे. यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला प्रशासकीय गती मिळाल्याचे मानले जात आहे.
विजय पिदुरकर यांनी या मार्गाच्या राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. हा मार्ग मंजूर झाल्यास वणी तालुक्यासह संपूर्ण परिसरातील उद्योग, व्यापार, कृषी, वाहतूक आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळेल. तसेच यवतमाळ–चंद्रपूर या दोन जिल्ह्यांतील नागरिकांसाठी हा मार्ग विकासाचा महत्त्वपूर्ण दुवा ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
