ठळक बातम्या

    ग्रामीण रुग्णालय वणीच्या समस्यांची आशिष खुलसंगे यांनी घेतली गंभीर दखल; पालकमंत्र्यांशी चर्चा करून तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : ग्रामीण रुग्णालय वणी येथे विविध मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची माहिती मिळताच शिवसेना नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सरपंच मा. आशिष (भाऊ) खुलसंगे यांनी सोमवारी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांचे प्रतिनिधी म्हणून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत सविस्तर बैठक घेत रुग्णालयातील अडचणींचा आढावा घेतला.

    बैठकीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र सुलभेवार, डॉ. पोहे, डॉ. अग्रवाल, डॉ. आवारी तसेच ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील विविध समस्यांची माहिती दिली. यामध्ये सुरक्षा रक्षकांची कमतरता, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्याचा अपुरा साठा, जनरेटरची निकृष्ट अवस्था, तसेच पोस्टमार्टेम कक्षाची इमारत जीर्ण होऊन धोकादायक स्थितीत असल्यासह इतर अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.

    यावर आशिष भाऊ खुलसंगे यांनी सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित डॉक्टरांना आश्वस्त केले की, या सर्व बाबींची तातडीने पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी चर्चा करण्यात येईल. रुग्णालयाला आवश्यक असलेल्या सुविधा, साहित्य आणि इतर कामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

    ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व अखंड आरोग्य सेवा मिळावी, यासाठी कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही. रुग्णालयातील सर्व समस्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

    या बैठकीस युवा सेना लोकसभा अध्यक्ष विक्रांत चचडा तसेच मारेगाव शिवसेना तालुकाप्रमुख विशाल किन्हेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

    Photo