ठळक बातम्या

    वणीतील वाहतूक कोंडीवर शिवसेना आक्रमक; वन-वे सुरू करा, टिळक चौकात वाहतूक पोलीस तैनात करा

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : वणी शहरात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर अखेर शिवसेनेने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली नरेश रणधीर पोलिस निरीक्षक वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी यांना निवेदन सादर करून शहरातील वाहतूक व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा मिळेल, अशा प्रभावी अंमलबजावणीची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

    निवेदनात कोविड काळात बंद करण्यात आलेली एकेरी वाहतूक व्यवस्था (वन-वे) तातडीने पुन्हा सुरू करावी, टिळक चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियुक्त करावेत तसेच कामगार चौकात वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी वाहतूक चौकी उभारण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

    शहरातील वाढती वाहनसंख्या, अनियंत्रित पार्किंग आणि प्रमुख चौकांमधील सततची वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ठोस आणि प्रभावी उपाययोजना करून वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

    वाहतूक कोंडीचा प्रश्न आता केवळ गैरसोयीचा न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा गंभीर विषय बनला असल्याने संबंधित विभागाने विलंब न लावता आवश्यक निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी, अन्यथा नागरिकांचा रोष तीव्र होण्याची शक्यता असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

    यावेळी जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्यासह दीपक कोकास, शुभम गोरे, वसुधा ढगे, मनीषा कोंगरे, भाग्यश्री वैद्य, सोनाली पुरी, हिमांशू बोहरा, शम सिद्दीकी, अनिल ढगे, अमृत पुरी, सुनील डोंगरे, राहुल उपाते आणि प्रज्योत ठावरी उपस्थित होते.

    Photo