ठळक बातम्या

    वणी पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी, घरफोडीचा प्रयत्न आणि बॅटरी चोरीचे ३ गुन्हे उघडकीस, ₹२०,९०० चा मुद्देमाल जप्त

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : दि. १० जुलै : वणी पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने घरफोडी, घरफोडीचा प्रयत्न आणि बॅटरी चोरी असे तीन गुन्हे उघडकीस आणत तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व दोन मोठ्या बॅटऱ्यांसह एकूण ₹२०,९०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. शहरात सातत्याने पेट्रोलिंग व गुप्त माहिती संकलित करून संशयितांचा शोध घेण्यात आला.

    या कारवाईत सुमित राजू मानकर (वय २२, रा. रंगनाथनगर, वणी) आणि राहुल उर्फ टिकल्या निलकंठ ठेंगणे (वय ३२, रा. रंगनाथनगर, वणी) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोडी व घरफोडीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यानुसार संबंधित दोन गुन्हे उघडकीस आले.

    तसेच स्वतंत्र कारवाईत विजय देवानंद मेश्राम (वय ३२, रा. नवीन लालगुडा, वणी) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता बॅटरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला. आरोपींकडून रोख रक्कम आणि दोन मोठ्या बॅटऱ्या असा एकूण ₹२०,९०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल (पांढरकवडा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या नेतृत्वात डी.बी. पथक प्रमुख पोउपनि. सय्यद साजिद, पोलीस हवालदार गजानन सावसाकडे, मारोती पाटील, निलकमल भोसले, पोलीस अंमलदार गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, मोनेश्वर खंडरे, रितेश भोयर, चालक शुभम किराक तसेच महिला पोलीस अंमलदार चेताली चेनेडे आणि सहकाऱ्यांनी पार पाडली.

    वणी पोलिसांच्या या कारवाईमुळे अलीकडील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा छडा लागला असून शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

    Photo