ठळक बातम्या

    'झाडे लावा-झाडे जगवा'चा लाखांदूरकरांचा निर्धार; वृक्षदिंडीसह ग्रामीण रुग्णालय व तहसील कार्यालयासमोर भव्य वृक्षारोपण

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    लाखांदूर (भंडारा) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने श्री संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समिती, लाखांदूर व संत गाडगेबाबा स्वयं सहाय्यता समूह यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात उत्साहपूर्ण वृक्षदिंडी काढून भव्य वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

    "झाडे लावा – झाडे जगवा"च्या घोषणांनी लाखांदूर शहर दणाणून गेले. पर्यावरण जनजागृती करणारे फलक हातात घेऊन नागरिकांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून वृक्षदिंडी काढली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय व तहसील कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्ग परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

    यावेळी उपस्थित सर्वांनी लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करून ते वृक्ष होईपर्यंत जपण्याची सामूहिक शपथ घेतली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले.

    या सामाजिक उपक्रमात नगराध्यक्ष विनोद ठाकरे, डॉ. दत्तात्रय ठाकरे, डॉ. महेश नाकाडे, फागोजी कडिखाये, नगरसेवक रिजवान पठाण, विश्वपाल हजारे, नितीन पारधी, गणेश ठाकरे, हरिदास राऊत, रमेश खरकाटे, प्रकाश भुते, संजय वाडगुळे, भोजराज कडिखाये, विजय पिल्लेवान, बाळकृष्ण ठाकरे, अशोक खवास, जनार्धन बेद्रे, कैलास भोंगे, बाळू नाकतोडे यांच्यासह अनेक मान्यवर, महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

    या पर्यावरणपूरक उपक्रमाचे लाखांदूरकरांनी मनापासून स्वागत करत आयोजकांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. वृक्षसंवर्धनासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याची भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.



    Photo