विदर्भाच्या न्यायासाठी संघर्ष सुरूच राहील; प्रत्येक वैदर्भीयाने हक्काच्या लढ्यात सहभागी व्हावे – माजी आमदार ॲड. वामनराव चटप
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
चंद्रपूर: विदर्भाच्या स्वतंत्र राज्याच्या मागणीला तब्बल १२१ वर्षे पूर्ण होऊनही आजपर्यंत या प्रश्नावर ठोस निर्णय न झाल्याने वैदर्भीय जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विकास, रोजगार, शेती, उद्योग, सिंचन, शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या बाबतीत विदर्भावर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना जनमानसात अधिक तीव्र होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी निर्णायक लढ्याचा इशारा दिला आहे. "आता हा संघर्ष अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. करो या मरो!" असा निर्धार व्यक्त करत त्यांनी विदर्भाच्या न्यायासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचे आवाहन केले.
त्यांनी सांगितले की, नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असलेल्या विदर्भाला त्याच्या हक्काचा विकास, रोजगाराच्या संधी आणि आर्थिक न्याय मिळालेला नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ हा केवळ राजकीय मुद्दा नसून, तो येथील जनतेच्या स्वाभिमानाचा आणि न्यायाचा प्रश्न आहे.
विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी, हक्काच्या निधीसाठी आणि भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक वैदर्भीय नागरिकाने या लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
"स्वतंत्र विदर्भ हा आमचा अधिकार आहे, आणि तो मिळविल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही," असा निर्धार व्यक्त करत विदर्भ राज्य आंदोलन समितीने आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. "विदर्भाच्या न्यायासाठी संघर्ष सुरूच राहील!" हा संदेश पुन्हा एकदा ठामपणे देण्यात आला आहे.

