ठळक बातम्या

    कोलगाव चेक पोस्टवर ९ जुलैला वेकोलीविरोधात रस्ता रोको आंदोलन; विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागरिकांचा इशारा

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : वेकोली वणी परिसरातील कोलगाव–मुंगोली कोळसा खाणीमुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांकडे प्रशासन व वेकोलीचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता कोलगाव चेक पोस्ट, साखरा–शिंदोला मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी दिली आहे.

    याबाबत उपविभागीय अधिकारी, वणी यांना निवेदन देण्यात आले असून, कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था, धूळ प्रदूषण, स्थानिकांना रोजगारात प्राधान्य, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, पर्यावरण संरक्षण तसेच प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    निवेदनात कोलगाव ते वेकोली चेक पोस्टपर्यंतचा रस्ता दुरुस्त करणे, साखरा–मुंगोली मार्गाचे मजबुतीकरण, कोळसा वाहतुकीसाठी सुरक्षित पार्किंगची व्यवस्था, विविध ठिकाणी स्ट्रीटलाइट बसविणे, धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी फवारणी, धोकादायक झाडे हटविणे, स्थानिक बेरोजगारांना रोजगारात प्राधान्य देणे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

    या मागण्यांवर वेकोली प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास ९ जुलै रोजी होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विजय पिदुरकर यांनी केले आहे. या आंदोलनाला स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि नागरिकांचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

    Photo