गांधी चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी निर्बंध, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती व नियोजनाची मागणी
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वणी शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधत मानवी हक्क सुरक्षा परिषद (ट्रस्ट) यांच्या वतीने मंगळवारी (दि. ७ जुलै २०२६) वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नरेश रनधिर यांना निवेदन सादर करण्यात आले. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध व सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौकातील मोठी कमान परिसरात दर काही मिनिटांनी वाहतूक ठप्प होत असून चारचाकी वाहने व ऑटोरिक्षांच्या वाढत्या वर्दळीमुळे नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
यामुळे गांधी चौकातील मोठी कमान ते टूटी कमान या मार्गावर चारचाकी वाहने व ऑटोरिक्षांचा प्रवेश नियंत्रित अथवा बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आगामी गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव यांसारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करून कोंडी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता निवेदनातून अधोरेखित करण्यात आली आहे.
याशिवाय, सकाळी १० ते दुपारी ३ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या गर्दीच्या वेळेत गांधी चौक परिसरात नियमित दोन अतिरिक्त वाहतूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या निवेदनावर मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजू धावंजेवार, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख परशुराम पोटे, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानघाटे, यवतमाळ जिल्हा प्रथम संपर्कप्रमुख सौ. सुमित्रा नारायणराव गोडे, महिला उपाध्यक्षा मनिषा सुरेंद्र निब्रड, वणी विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब आसुटकर, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने, वणी तालुका महिला अध्यक्षा सौ. सुनिता काळे, वणी शहर महिला अध्यक्षा सौ. प्रमिला चौधरी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बन्सोड, ज्ञानेश्वर बोनंगिरवार,किटकुले,संजय चिंचोलकर, आकाश दुबे तसेच मारेगाव तालुका अध्यक्ष अमोल कुमरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

