विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वणी आणि शिरपूर येथील पोलीस स्टेशन तसेच पोलीस वसाहतीच्या नवीन प्रशासकीय इमारतींना तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वणी व शिरपूर येथील पोलीस कार्यालय आणि पोलीस वसाहतीच्या इमारती सुमारे १०० वर्षांपूर्वीच्या असून अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. अनेक निवासी इमारती खचून पडल्या असून उर्वरित इमारतींमध्ये राहणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.
तसेच, अपुऱ्या आणि असुरक्षित निवास व्यवस्थेमुळे अनेक पोलीस कर्मचारी खासगी भाड्याच्या घरात राहत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत तातडीने कर्तव्यावर हजर होण्यास अडचणी निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सन २०१७ पासून २०२३ पर्यंत या इमारतींना मंजुरी मिळावी यासाठी पोलीस विभागामार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत पत्रव्यवहारही झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, अद्याप प्रत्यक्ष मंजुरी मिळालेली नाही.
वणी तालुका हा कोळसा, सिमेंट, डोलोमाईट, चुनखडी, वनसंपदा तसेच पैनगंगा, निरगुळा, वर्धा आदी जलसंपत्तीने समृद्ध असून शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळवून देणारा तालुका आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाला आधुनिक प्रशासकीय कार्यालय व सुरक्षित निवासी वसाहतीची अत्यंत गरज असल्याचेही विजय पिदुरकर यांनी अधोरेखित केले आहे.
या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर पाठपुरावा करून वणी व शिरपूर येथील पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीच्या नवीन इमारतींना तातडीने मंजुरी देऊन कामाला गती द्यावी, अशी मागणी विजय पिदुरकर यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे
