विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी वणी बसस्थानकात सेवाभाव जपत पिण्याचे पाणी व खाऊचे वाटप करण्यात आले. नातजल पाणी विक्रेते अतुल हांडे यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवून वारकऱ्यांच्या प्रवासात दिलासा देण्याचे कार्य केले.
या उपक्रमात बसस्थानकातून पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या वारकऱ्यांना पिण्याचे पाणी व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या एसटीच्या चालक व वाहकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजू धावंजेवार, पत्रकार नाना बोनगीरवार तसेच वणी बसस्थानकातील कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी अतुल हांडे यांच्या सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा सेवाभावी उपक्रमातून समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे मत व्यक्त केले.
आषाढी वारीच्या पवित्र पर्वावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे बसस्थानक परिसरात भक्तिमय आणि सेवाभावाचे वातावरण निर्माण झाले.


