विदर्भवार्ता । प्रतिनिधी
झरी : झरी तालुक्यातील प्रस्तावित मार्की-झरी जामणी-अडकोली कोलमाईन्स प्रकल्पासंदर्भात पर्यावरण जनसुनावणीपूर्वी विविध मुद्द्यांवर गंभीर हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून प्रकल्पातील अनेक बाबींची सखोल चौकशी करूनच पर्यावरणीय मंजुरी द्यावी, अशी मागणी केली आहे.
निवेदनात प्रकल्पामुळे परिसरातील शेती, जंगल, जलस्रोत, वन्यजीव, जैवविविधता, पर्यावरण तसेच स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. प्रस्तावित कोळसा खाण प्रकल्पासाठी आवश्यक असलेली संपूर्ण माहिती ग्रामस्थांसमोर पारदर्शकपणे मांडण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तसेच खाण प्रकल्पामुळे होणारी कोळशाची वाहतूक कोणत्या मार्गाने होणार, दररोज किती ट्रक धावणार, रस्त्यांची भारक्षमता किती आहे, धूळ व प्रदूषण नियंत्रणासाठी कोणती उपाययोजना केली जाणार, याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात राखीव जंगल, औषधी वनस्पती, वन्यजीवांचे अधिवास, पर्यावरणीय संतुलन, भूजल, नदी-नाले तसेच स्थानिक जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांचा स्वतंत्र अभ्यास करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या सीएसआर निधीचा वापर, स्थानिकांना रोजगार, विस्थापित शेतकरी व शेतमजुरांचे पुनर्वसन, खाण बंद झाल्यानंतर रोजगाराचे पर्याय आणि पर्यावरण पुनर्स्थापनेबाबतही सविस्तर माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, प्रकल्पासाठी जमीन संपादन करताना कायदेशीर प्रक्रिया, योग्य मोबदला, वनहक्क, पारंपरिक वनवासींचे हक्क आणि ग्रामस्थांच्या उपजीविकेचे संरक्षण याबाबत ठोस हमी देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
विजय पिदूरकर यांनी जनसुनावणीदरम्यान ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करून, चुकीची अथवा अपूर्ण माहिती असल्यास त्यामध्ये दुरुस्ती करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे. या निवेदनामुळे प्रस्तावित कोलमाईन्स प्रकल्पाबाबत परिसरात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली असून जनसुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


