ठळक बातम्या

    बेलोरा चेकपोस्ट परिसरातील धोकादायक वाहतुकीवर तातडीने उपाययोजना करा; विजय पिदुरकर यांचे प्रशासनाला निवेदन

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी, दि. २० जुलै : बेलोरा चेकपोस्टजवळ वर्धा नदीवरील यवतमाळ-चंद्रपूर जिल्हा सीमेलगत नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे व अपघातांच्या धोक्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी उपविभागीय अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग), शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व वणी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

    निवेदनात म्हटले आहे की, बेलोरा चेकपोस्ट परिसरातील नवीन पूल बांधून पूर्ण झाला असला तरी तो अद्याप नियमित वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे जुन्या पुलावर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण होत असून नागरिकांना वाहतूक कोंडी व गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

    याशिवाय निलजई, नायगाव, पैनगंगा, कोलगाव, मुंगोली आदी भागांतून कोळसा वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे परिसरात धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोळसा वाहतूक करणारे ट्रक रस्त्यालगत उभे राहत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका व दैनंदिन प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

    निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, पुलाजवळ तयार करण्यात आलेल्या उतार मार्गामुळे वारंवार अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    विजय पिदुरकर यांनी संबंधित विभागांनी संयुक्त पाहणी करून बेलोरा चेकपोस्ट परिसरातील धोकादायक वाहतूक, प्रदूषण व वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, नवीन पुलावर वाहतूक सुरू करावी तसेच नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

    Photo