ठळक बातम्या

    नांदेपेरात अवजड वाहतुकीविरोधात ग्रामस्थांचा चक्काजाम; प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

     विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : नांदेपेरा गावातून सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि शिक्षकांना होत असलेल्या गंभीर त्रासाच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. २१ जुलै) शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शांततापूर्ण चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनाद्वारे गावातील वाढता अपघातांचा धोका, वाहतुकीची कोंडी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न प्रशासनासमोर ठामपणे मांडण्यात आला.

    आंदोलनाची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिदूरकर आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. ग्रामस्थांनी अवजड वाहनांमुळे गावातील मुख्य रस्त्यावर निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती, शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

    यावेळी पोलिस प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागण्या गांभीर्याने घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या पुढाकाराने चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले.

    या आंदोलनात राहुल मुंजेकर, शुभम गोरे (युवासेना लोकसभा समन्वयक), राहुल पारखी, रोहन पारखी, कपिल कुंटलवार, अमृत पुरी, राजू खामणकर, गणेश लांडगे, प्रज्योत ठावरी, निलेश हेपट यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले.

    आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडले असले तरी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करून नांदेपेरा गावातील अवजड वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणावे, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

    Photo