ठळक बातम्या

    दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा वंचित बहुजन आघाडीचा निषेध; राष्ट्रपतींना निवेदन देत कारवाईची मागणी


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     वणी : दिल्ली येथे २० जुलै २०२६ रोजी सातत्याने सुरू असलेल्या शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित अमानुष मारहाणीचा वंचित बहुजन आघाडी, वणी शहर व तालुका शाखेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. यासंदर्भात भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    निवेदनात म्हटले आहे की, शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीमार करून अमानुष वागणूक दिली. महिला विद्यार्थिनींनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


    वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रपतींकडे केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –


    -विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईची उच्चस्तरीय चौकशी करावी.

    -या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.

    -आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.

    -आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी.

    या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष, तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून, विद्यार्थ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

    Photo