विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
यवतमाळ : दि. २५ जुलै : सन २०२० मध्ये घडलेल्या गाजलेल्या खून प्रकरणात जिल्हा न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. भक्कम पुरावे, सखोल तपास आणि प्रभावी न्यायालयीन प्रक्रियेमुळे आरोपी दोषी सिद्ध झाल्याने न्यायालयाने कठोर शिक्षा ठोठावली.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन लोहारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सचिन लुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक (PSI) संतोष जायभाये तसेच जमादार आशीष भुसारी यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावत आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले. त्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील निष्कर्ष यांचा सखोल विचार करून न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या निकालामुळे यवतमाळ जिल्हा पोलिसांच्या प्रभावी तपासकार्याला न्यायालयाची दुजोरा मिळाला असून, गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा मिळवून देण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निकालामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होणार असून, नागरिकांमध्ये न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
