ठळक बातम्या

    तीन वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या पिल्की वाढोणा जिल्हा परिषद शाळेत नेरड केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी / पिल्की वाढोणा : पंचायत समिती वणी अंतर्गत नेरड केंद्राची जुलै महिन्याची शिक्षण परिषद सोमवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिल्की वाढोणा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली ही शाळा पूर्ववत सुरू झाल्यानंतर प्रथमच येथे शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन करण्यात आले.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. किशोर नांदेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण विस्तार अधिकारी व सत्कारमूर्ती श्री. रमेश बोबडे उपस्थित होते. तसेच उपसरपंच सौ. रत्नमाला अरुण झाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. संतोष काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री. गजानन भगत यांनी केले. श्री. अकिब खान यांनी जयंत नारळीकर गणित-विज्ञान उपक्रम तसेच खान अकादमी विषयावर मार्गदर्शन केले. तर श्री. प्रकाश तालावर यांनी विनोबा ॲपच्या वापराबाबत शिक्षकांना सविस्तर माहिती दिली.

    यावेळी माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. रमेश बोबडे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. शिक्षण परिषदेत विविध शैक्षणिक उपक्रम, प्रशासकीय बाबी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

    ही शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षक, ग्रामस्थ, स्वयंसेवक, अंगणवाडी कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. पिल्की वाढोणा येथील विद्यार्थी, ग्रामस्थ आणि नेरड केंद्रातील सर्व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश तालावर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. नामदेव ढेंगळे यांनी मानले. तीन वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या शाळेत भरलेली ही शिक्षण परिषद परिसरातील शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरली.

    Photo